कमलनाथ, भूपेश बघल यांच्यासह दिग्गजांचा समावेश
येस न्युज नेटवर्क : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कडून तीन राज्यांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने रविवारी, 15 ऑक्टोबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर महत्त्वाच्या जागांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे काही दिग्गज नेते या जागांवर निवडणूक लढवणार आहेत. या जागांवर सहज विजय मिळेल, अशी काँग्रेसला आशा आहे. यामुळे तिन्ही राज्यांमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे.
काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या यादीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा जागा व्हीआयपी सीट मानली जात आहे. याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री कमलनाथ येथून निवडणूक लढवत आहेत. कमलनाथ यांच्या मतदारसंघात भाजपने विवेक बंटी साहू यांना तिकीट दिलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी विवेक बंटी साहू यांचा 25 हजार मतांनी पराभव केला होता.