येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची सध्या सोलापुरात फरफट होत आहे.आपल्या आप्तेष्टांचा मृतदेह व्यवस्थितपणे अंत्यसंस्कार होत आहे का ? याची काळजी घेत असताना महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी 22 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता मृत्युमुखी पडलेल्या सोलापुरातील शामराव दत्तात्रय कुलकर्णी यांचा मृतदेह पुढील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत हलविण्यास तब्बल चोवीस तासांचा कालावधी लागला कुलकर्णी यांचे पत्र अजिंक्य यांनी अनेक ओळखीच्या लोकांना दूरध्वनी केले, परंतु सर्वांनी दूरध्वनीवरून लवकरात लवकर शववाहिका येईल एवढाच दिलासा वारंवार दिला.
सिव्हिल रुग्णालयासमोरील आयडी एच या महापालिकेच्या शववाहिका केंद्राला अनेक वेळा संपर्क साधून देखील पंधरा ते वीस मिनिटात शववाहिका येईल , असे उत्तर सकाळी दहा वाजल्यापासून देण्यात येत होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास शववाहिका कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथून ती अक्कलकोट रोड येथील पद्मशाली स्मशानभूमीतील गॅस दाहिनीमध्ये नेण्यात आली. त्यानंतर म्हणजे मृत्यू होऊन चोवीस तास उलटल्यानंतर स्वर्गीय शामराव कुलकर्णी यांच्या पार्थिवावर गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू आणि आई कोरणा मधून बरी होऊन चार पाच दिवसांपूर्वीच घरी आलेली असल्यामुळे अत्यंत तणावाच्या स्थितीत असलेल्या अजिंक्य कुलकर्णी याने ही सारी व्यथा बोलून दाखवली .अजिंक्य त्याचा काका संजय कुलकर्णी आणि त्यांची मुलगी सध्या कोरोनामधून नुकतेच बरे झालेले असल्यामुळे घरीच आहेत. त्यामुळे तेदेखील अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले असले तरी, महापालिका प्रशासनाने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना योग्य ती माहिती तत्परतेने पुरविली पाहिजे आणि तासनतास वाट पाहण्यास लावू नये ,अशी रास्त अपेक्षा अजिंक्य कुलकर्णी यांनी व्यक्त केली.