आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाने त्यांच्या योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक व्यावसायिक गॅस सिलेंडरची मागणी तालुका निहाय प्रशासनाकडे सादर करावी
सर्व पुरवठा निरीक्षकांनी घरगुती गॅसचा अवैध वापर होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी
व्यावसायिक गॅस सिलेंडरवर बंदी असली तरी घरगुती गॅस सिलेंडर नियमितपणे मिळणार, नागरिकांनी न घाबरण्याचे प्रशासनाचे आवाहन
घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर शहरी भागात 25 दिवसात तर ग्रामीण भागात 45 दिवसात मिळणार
सोलापूर – मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस पुरवठा आवश्यक असणाऱ्या सर्व संबंधित शासकीय विभाग तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकारचे रुग्णालय यांना व्यावसायिक गॅस पुरवठा मागणीप्रमाणे केला जाणार आहे. तरी संबंधित विभागांनी तालुका निहाय याद्या पुरवठा विभागाला उपलब्ध करून द्याव्यात त्याप्रमाणे संबंधित तालुक्यातील एजन्सी कडून व्यावसायिक गॅसचा पुरवठा संबंधित यंत्रणांना होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने एलपीजी पुरवठा बाबतच्या बैठकीत जंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी तसेच तहसीलदार तालुका पुरवठा निरीक्षक उपस्थित होते.
प्र. जिल्हाधिकारी श्री. जंगम पुढे म्हणाले की,
आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण जिल्हा परिषद व राज्य, आरोग्य जिल्हा परिषद, राज्य व महापालिका, इतर बहुजन विभागांनी शालेय पोषण आहार तसेच आश्रम शाळा, निवासी शाळा साठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची मागणी तालुका निहाय पुरवठा विभागाला तात्काळ सादर करावी. त्या यादीप्रमाणे संबंधित तालुक्यातील गॅस पुरवठा एजन्सीला संबंधित यंत्रणेला व्यवसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल कंपनीच्या 94 गॅस एजन्सी कडून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. सद्यस्थितीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केलेला आहे. परंतु घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरू नये व प्रशासनाला सहकार्य करावे. गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सी शी झालेल्या चर्चेनुसार किमान आठ ते दहा दिवसाचा घरगुती सिलेंडरचा स्टॉक उपलब्ध असून त्या कंपन्यांना नियमितपणे घरगुती गॅस पुरवठा होत असल्याने नागरिकांनी काळजी करण्यासारखे नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या पुरवठा विभागाच्या निरीक्षकांनी तालुकास्तरावर गठित करण्यात आलेले दक्षता पथके व भरारी पथकामार्फत जिल्ह्यात कुठेही अवैध गॅस सिलेंडरचा वापर होणार नाही या दृष्टीने अत्यंत दक्ष राहून काम करावे. अवैध गॅस वापर तक्रार किंवा माहिती मिळाल्यास तात्काळ त्या ठिकाणी धाडी टाकून कारवाही करावी. यासाठी शहर व ग्रामीण भागातील पोलीस विभागाने या पथकांना आवश्यक ते सहकार्य करावे. तसेच गॅस एजन्सी समोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यास त्या ठिकाणी पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशाही सूचना जंगम यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या चार हजार 92 शाळा पैकी 3600 शाळांना शालेय पोषण आहारासाठी घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना व्यावसायिक गॅस कनेक्शन दिलेले आहेत. तर 150 वसतिगृहांना वैयक्तिक गॅस कनेक्शन आहेत. राज्य समाज कल्याण विभागाच्या 16 वसतिगृहे व दोन आश्रम शाळांना व्यावसायिक गॅस कनेक्शन आहेत. इतर बहुजन मागास विभागाचे दोन वस्तीगृहे व 97 आश्रम शाळा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांना व्यवसायिक गॅस पुरवठा केला जातो तर सोलापूर महापालिके अंतर्गत सर्व शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयाला व्यावसायिक गॅस पुरवठा किती प्रमाणात आवश्यक आहे याबाबत सायंकाळपर्यंत प्रशासनाला सादर केल्या जाणार आहेत.
एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल कंपनीच्या प्रतिनिधी यांच्याकडून कळविण्यात आले की घरगुती वापर गॅस सिलेंडर किमान आठ ते दहा दिवस साठा उपलब्ध आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा अत्यावश्यक सेवा साठी मागणीप्रमाणे उपलब्ध केला जाणार आहे. तसेच घरगुती गॅस पुरवठा कंपन्यांकडून नियमितपणे सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध केला जात असल्याने घरगुती गॅस सिलेंडरची कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याची माहिती एचपीसीएलचे प्रतिनिधी विनोद कुमार यांनी दिली.
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थिती पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात इंधन व गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्ह्यात 94 गॅस एजन्सी मार्फत घरगुती व व्यावसायिक गॅस पुरवठा केला जातो. सद्यस्थितीमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असून घरगुती गॅस पुरवठा नियमितपणे सुरू आहे. घरगुती गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसात सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात 12 लाख घरगुती गॅस तर दहा हजार आठशे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरकर्ते असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे जिल्ह्यात डिझेल व पेट्रोलचा पुरेसा पुरवठा निमितपणे होत असल्याचे सांगितले.

