भेंडीची भाजी म्हणजे सर्वच घरांमध्ये पुरुष मंडळी नाक मुरडताना दिसतात. परंतु मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने लाल भेंडी शेतामध्ये लावली आहे . आश्चर्याची बाब म्हणजे केवळ रंग नव्हे तर या भेंडीची हाय-फाय किंमत देखील लोकांना आश्चर्यचकित करीत आहे. मध्यप्रदेशातील खजुरी कलान जिल्ह्यातील मिश्रीलाल राजपूत या शेतकऱ्याने हि लाल भेंडी उत्पादित केली आहे.
सोशल मीडियावर या लाल भेंडी ने भाव खाल्ला आहे . काही मॉलमध्ये ही भेंडी 300 ते 400 रुपये अर्धा किलो मिळत आहे. या भेंडी चा स्वाद खूपच चांगला असल्यामुळे लोक ही भेंडी पसंत करत आहेत . मिश्रीलाल या शेतकऱ्याने सांगितले की, वाराणसी येथील अग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मधून एक किलो बियाणे खरेदी केले होते . जुलैच्या पहिल्या आठवड्यात या भेंडीची लागवड केली. 40 दिवसानंतर रोपांना भेंडी लागण्यास सुरुवात झाली. भेंडीची शेती करीत असताना कोणत्याही कीटकनाशकाचा वापर केला नाही . एक एकर जमिनीमध्ये साधारणपणे 40 ते 50 क्विंटल भेंडी मिळत असल्याचे त्याने सांगितले. नेहमीच्या हिरव्या भेंडी पेक्षा लाल भेंडी अधिक पौष्टिक असल्याचे सांगण्यात येते . ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास होत असेल किंवा ब्लडप्रेशर व मधुमेह असल्यास त्यांच्यासाठी ही लाल भेंडी उपयुक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.