सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाची विक्रमी कामगिरी : तीन महिन्यांत ₹57.78 कोटींची वसुली ; आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्याकडून उपायुक्त आशिष लोकरे व त्यांच्या टीमचे केले कौतुक..
सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने पहिल्या तीन महिन्यांत ₹57 कोटी 78 लाख 34 हजार 454 रुपयांची विक्रमी वसुली करून महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ केली आहे. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी विभागाला दिलेले तीन महिन्यात ₹48 कोटींचे उद्दिष्ट ओलांडत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मालमत्ता कर वसुली मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले. कर वसुली कार्यवाहीस गती देताना क्षेत्रीय पातळीवर कर निर्धारण, थकबाकीदारांना नोटीस बजावणे, डिजिटल माध्यमांचा वापर करून आठवणीनिर्देश पाठवणे व थेट संवाद साधणे या विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला.
या योजनांचे यशस्वी अंमलबजावणीत उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता कर विभागाने अत्यंत शिस्तबद्ध, समर्पित व योजनाबद्ध पद्धतीने कार्य केले. त्यात विभागप्रमुख युवराज गाडेकर, व कर निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी, संगणक प्रणालीसंबंधित कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, “मालमत्ता कर वसुलीतील ही आकडेवारी महापालिकेसाठी प्रेरणादायी ठरेल. ही वसुली केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर कार्यपद्धतीच्या दृष्टीनेही एक मैलाचा दगड आहे. हीच ऊर्जा पुढील महिन्यांमध्येही टिकवून ठेवणे आवश्यक आहे.”
महानगरपालिका आगामी काळात अधिकाधिक नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती मोहिम राबविणार असून, थकीत कर वसुली, नव्या मालमत्तांची नोंदणी व कर निर्धारण प्रक्रियाही अधिक गतिमान करण्यात येणार आहे.