सोलापूर – सतत आणि चिंतनशील वाचनामुळे मनावरील ताण-तणाव कमी होतो, सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो आणि ज्ञानात सातत्याने भर पडते. वाचन ही केवळ सवय नसून व्यक्तिमत्त्व घडविणारी संस्कृती आहे. वाचनाने माणूस समृद्ध बनतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राच्यावतीने डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान व उत्कृष्ट वाचक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. वेदपाठक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, माजी आमदार धनाजी साठे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी चे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. अनिल घनवट यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.



‘वाचन संस्कृती आणि शिक्षण संस्थांचे योगदान’ या विषयावर बोलताना प्रा. वेदपाठक यांनी बदलत्या तंत्रज्ञानयुगात वाचनाची सवय अधिक जपण्याची आवश्यकता अधोरेखित केली. चिंतनशील, चिकित्सक आणि संदर्भाधारित वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, विचारांची परिपक्वता आणि सामाजिक जाण वाढीस लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या आठवणींना देखील त्यांनी यावेळी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. महानवर यांनी सांगितले की, ग्रंथ हे केवळ माहितीचे स्रोत नसून ते मन आणि बुद्धीला सक्षम करणारे साधन आहे. वाचनामुळे मनगटाला बळ मिळते. विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्र डिजिटल करण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही ठिकाणाहून आवश्यक ग्रंथसंपदा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास जयकुमार शितोळे, डॉ. ए. बी. शेख, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. समाधान पवार, डॉ. शशिकांत गायकवाड, डॉ. वीरभद्र दंडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नानासाहेब गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पल्लवी सावंत यांनी मानले.
उत्कृष्ट वाचकांचा गौरव
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी उत्कृष्ट वाचकांचा सन्मान केला जातो. यंदा विद्यार्थी गटातून सिद्धी येडम व सचिन इक्कलाकी, शिक्षक गटातून डॉ. तानाबाई पाटील आणि कर्मचारी गटातून सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि वृक्षरोप असे पुरस्काराचे स्वरूप होते.

