काबूल : अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यापासून अफगाणिस्तानात वाढले आहेत. मागील तीन चार महिन्यांपासून या देशातील शांतता भंग झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत आहे. तालिबान संघटनेच्या दहशतीमुळे अनेक नागरिक आपला देश सोडून अन्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या एका पॉश भागात मंगळवारी पुन्हा एक शक्तिशाली विस्फोट झाला आहे.विशेष म्हणजे याठिकाणी अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी राहतात. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु अनेक छोटे स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले आहेत. तालिबानचे घातक हल्ले लक्षात घेता अफगाणिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या विषयावर त्वरित चर्चा करावी, अशी मागणी भारताकडे करण्यात आली आहे.
अफगाणिस्तानचे गृहमंत्री मीरवाइस स्तानिकझई यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ग्रीन झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजधानीच्या अत्यंत सुरक्षित भागात हा विस्फोट झाला आहे. अलीकडच्या काळात राजधानीत झालेला हा पहिला विस्फोट आहे. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्विकारली नाही, पण तालिबानी बंडखोरांनी हे कृत्य केल्याची शक्यता आहे. कारण तालिबानी बंडखोर या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आक्रमक वाटचाल करत आहेत. देशाच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील भागावर दबाव आणला जात आहे.काबूलमध्ये अलीकडे झालेल्या काही हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट गटाने घेतली आहे. परंतु काबूलमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र, सरकार तालिबानला दोष देत आहे आणि तालिबान अफगाण सरकारला या हल्लासाठी दोष देत आहे.