सोलापूर दिनांक – जगातील एकमेव असा 30 हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर पंतप्रधान आवास योजना शहरी भाग अंतर्गत बेघराला घर, परवडणाऱ्या दरात,सहकार तत्वावर कुंभारी येथे साकारत आहे.यातील पहिल्या टप्यातील पंधरा हजार घरांचे हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि बीज भांडवल राज्य सरकार मार्फत तातडीने अदा करण्यासाठी संबंधित सर्व खातेनिहाय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून निर्णय घोषित करण्याचे सकारात्मक आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय येथे रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना दिल्याची माहिती कॉ.आडम मास्तर यांनी दिली.
मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी मुबंई मंत्रालय येथे मा.मुख्यमंत्री कार्यालय येथे रे नगर व सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी रे नगर चे सचिव कॉ.युसूफ शेख मेजर हे उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांच्या कुटुंबिय सदस्य यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष व शासन आणि प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, तसेच न्यायालयीन लढाईत कर्मचाऱ्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्याच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे.
इतकेच नसून 2009 ते 2015 या कालावधीत परिवहन चे कायम कर्मचारी पैकी 49 कर्मचारी मयत आहेत.त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची अत्यंत वाईट आणि हालकीची परिस्थिती झाली यासाठी त्याला मिळणाऱ्या सेवा व लाभासाठी सतत रस्त्यावर येऊन संघर्ष करावे लागत आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्यासंबधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या संबंधितांना आदेश देण्याचे आश्वासन दिले.