महाड : अतिवृष्टीने कोकणावर पुरपरिस्थिती ओढवली. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या घटनेनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली. दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जे गेले त्यांना परत आणू शकत नाही; मात्र जे या घटनेतून वाचले त्यांना सांभाळण्याच काम आम्ही करू, अस नारायण राणे म्हणाले.
यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले .तळीयेत माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ४४ मृतदेह सापडले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे. बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याकडून मदत देण्यात आली असली, तरी या मदतीपलिकडे आणखी मदत होणार नाही, अस नाही. त्याचे पूनर्वसन पंतप्रधान आवास योजनेतून केले जाईल. त्यांना चांगली आणि पक्की घरे दिली जातील. राज्य व केंद्र सरकार दोघही ही वसाहत पुन्हा उभारतील. एकच गोष्ट अशी जी आम्हाला परत आणता येणार, ती म्हणजे मृत्यू पावलेली माणस. शासकीय यंत्रणा चांगल काम करत आहेत. त्यामुळे या आपत्तीतून सुदैवान जी माणस वाचली, त्यांना सांभाळण्याच काम आम्ही करू. या माणसांच्या मागण्या सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रांत अधिकारी नेमण्याची सूचना केली आहे. काही लोकांनी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे . त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पुनर्वसन केल जाईल”, अस राणे यांनी सांगितल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नुकसानीची माहिती दिली जाईल. मी येतानाच पंतप्रधानांशी बोललो आहे. त्यांनी मला अहवाल सादर करण्यास सांगितल आहे. कोकणात कायमस्वरूपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करू. आपण असे प्रश्न विचारू नका की त्यातून वाद होईल. या घाटातील डोंगर कोसळेल याची कुणाला तरी कल्पना आली होती का? नाही ना… त्यामुळे कुणावर आरोप करण्याची ही वेळ नाही . घडलेल्या घटनेमधील जे दुःखात बुडालेले आहेत. त्यांचे प्रश्न आपण आधी सोडवू. नंतर बाकीच बघू… वादाचे मुद्दे आतातरी विचारू नका , अस आवाहन करत राणे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.“केंद्र सरकारकडून आधीच मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी मला पाहणीसाठी पाठवल आहे. त्यांनी मला पाहणी करून अहवाल देण्यास सांगितल आहे. सध्या तरी मृतदेह बाहेर काढण्याच काम सुरू आहे. त्याचबरोबर पुनर्वसन करण्याचे काम केले जात आहे, असे राणे यांनी सांगितले . यावेळी राज्य सरकारशी यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला.