सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. राज्यभरात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सिंधुदुर्गात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं. त्याचवेळी महाविकास आघाडीतील नेते राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तिथे आधीपासूनच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. कधीकाळी सहकारी असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने-सामने आले. त्यानंतर राणे समर्थक आणि शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीचं रुपांतर हाणामारीत झालं.
राजकोट किल्ल्यावर राणे पिता-पुत्र आणि आदित्य ठाकरे दाखल होताच. दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे येताच राणे समर्थकांनी पेंग्विन, पेंग्विन म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले. राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. घोषणाबाजी, हाणामारीनंतर पोलिसांनी अधिकची कुमक मागवली. साधारणतः तासभर ठिय्या दिल्यानंतर पोलीस संरक्षणात छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले. त्यावेळीही राणे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ठाकरे-राणे राड्यावेळी नेमकं काय घडलं?
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाचा अभूतपूर्व राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने मालवणमध्ये मोर्चाची हाक दिली होती.मोर्चाआधी आदित्य ठाकरे, वडेट्टीवार, जयंत पाटील हे किल्ल्यात पाहणीसाठी आले. मात्र आदित्य ठाकरे किल्ल्यात दाखल होण्याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे किल्ल्यात शेकडो कार्यकर्त्यांसह दाखल झाले. किल्ल्याची पाहणी केल्यावर राणे पितापुत्र किल्ल्याच्या पुढील दरवाजाकडे आले असतानाच आदित्य ठाकरे आले. आदित्य ठाकरे मुख्य पुतळ्याच्या घटनास्थळी पाहणी करत असतानाच खाली ठाकरे गट आणि राणे समर्थकांच्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. बघताबघता या घोषणाबाजीने धक्काबुक्कीचं स्वरूप घेतलं. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. दरम्यान नारायण राणेंना प्रश्न विचारण्याच्या प्रयत्न करणारे माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनाही राणेंनी दमदाटी केली. राणेंनी माझाचा बुम माईक ढकलून दिला… दरम्यान जयंत पाटील यांनी वारंवार दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्याशी ते वारंवार संवाद साधत होते. कार्यकर्त्यांनी आपापसातल्या धक्काबुक्कीत किल्ल्याच्या भिंतीवर लावलेले चिरेहील खाली पाडले. मागील दाराने ठाकरे गटाने जाण्याची मागणी राणे समर्थकांनी लावून धरली. मात्र दोन्ही गट पुढील दरवाजानेच बाहेर जाण्यावर ठाम होते. अखेर दीड वाजताच्या सुमारास आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांच्या गराड्यात जोरदार घोषणाबाजी करत किल्ल्यातून पुढच्या दाराने बाहेर पडले.