सोलापूर – महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सोलापूर शहरातील नामांकित आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल ला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. योगेश राठोड व त्यांच्या राठोड परिवाराने त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या भेटीदरम्यान नाईक यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली आणि गरजूंना दिल्या जाणाऱ्या सेवा, विशेषतः महात्मा फुले जनआरोग्य योजना व मेडिक्लेम योजनेअंतर्गत होणाऱ्या उपचार पद्धतींचे विशेष कौतुक केले. “अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि सेवा-भावनेचा उत्तम समन्वय म्हणजे आधार हॉस्पिटल,” अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना नाईक यांनी, “राठोड बंधू आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी खंबीरपणे उभे आहोत. शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजूंना मिळावा यासाठी अशा संस्थांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना शहरप्रमुख सचिन चव्हाण, सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड, भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, राष्ट्रीय गोर बंजारा परिषदेचे युवक अध्यक्ष श्रीमंत चव्हाण, अशोक चव्हाण, राजमोती राठोड, डॉ. माधव जोशी, अमोल दळवी, अमोल गायकवाड, दिनेश राठोड, धनराज कटकम, चंद्रकांत राठोड यांचा समावेश होता.
हॉस्पिटलच्या वतीने डॉ. योगेश राठोड यांनी नाईक यांचे आभार मानले व आधार हॉस्पिटलकडून समाजाप्रती असलेली सेवा-भावना अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.