पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
आज सकाळी साडे अकराच्या सुमारास माजी खासदार राजू शेट्टी दिल्लीवरून पुण्यात आले होते. पुण्यात विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. मात्र, नंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्यानंतर मात्र, डॉक्टरांनी त्यांना तातडीने अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शेट्टी रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना सध्या कोणताही त्रास होत नाही. केवळ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आल्याचं शेट्टी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. दरम्यान, राजू शेट्टी नेहमी दिनानाथ रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल होतात, असंही या निकटवर्तीयांनी सांगितलं.