पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीरमध्ये भारताने हवाई हल्ला केल्यानंतर भारतात सीमेलगत असलेल्या राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. राजस्थान आणि पंजाब राज्य अलर्ट मोडवर असून पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
राजस्थान आणि पंजाबच्या सीमा सील
राजस्थानची १ हजार ३७ किमीची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे या राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्याची सीमा पूर्णपणे सील करण्यात आली असून संशयास्पद हालचाली आढळल्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शूट अॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, भारतीय हवाई दलही सज्ज आहे. पश्चिम क्षेत्रातील आकाशात लढाऊ विमाने गस्त घालत असल्याने जोधपूर, किशनग्रह आणि बिकानेर विमानतळ ८ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तसंच, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.
सुखोई-३० एमकेआय जेट्स गंगानगर ते कच्छच्या रणपर्यंत हवाई गस्त घालत आहेत. बिकानेर, श्री गंगानगर, जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि चालू परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीमावर्ती गावे हाय अलर्टवर आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना दुसरीकडे स्थलांतर करण्याचीही योजना आखण्यात आली आहे. सीमेजवळील ड्रोनविरोधी यंत्रणा देखील सक्रिय करण्यात आल्या आहेत. जैसलमेर आणि जोधपूरसाठी मध्यरात्री ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॅकआउट करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ब्लॅकआउटमुळे हाय-स्पीड विमानांसाठी समस्या निर्माण होतात, ज्यामुळे शत्रूच्या वैमानिकांना हल्ला करणे कठीण होते.