मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधान केले आहे. त्यामुळे राज ठाकरे हे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? असा सवाल केला जात आहे. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे. राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर परप्रांतियांचा मुद्दा आणि हिंदुत्व या दोन विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली.
यावेळी राज यांनी कोविडच्या दीड वर्षात माझी भूमिका मी जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. आता कोविड कमी झाला. मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेल, पण अन्य प्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असं राज यांनी सांगितल्याचं पाटील यांनी स्पष्ट केले .
राज ठाकरे हे परप्रांतियांच्ंया विरोधात असल्याचे चित्र आहे. हे चित्र त्यांनी बदलले पाहिजे. त्यांनी भूमिका व्यापक करत नाही, तोपर्यंत थोडी मर्यादा राहील. त्यांनी भूमिका सांगितली. आता ती व्यवहारात आणली पाहिजे. ते तेवढं शक्य नाही. त्यांच्या मनात कुणाबद्दल कटुता नाही याबाबत मी कन्व्हिन्स झालो आहे. पण याचा निष्कर्ष असा नाही की उद्याच निवडणुकीवर चर्चा होईल आणि जागा वाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले .
राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. येत्या पालिका निवडणुकीत संजय राऊतांनी मुंईतील सेफ जागा शोधावी आणि तिथून निवडणूक लढवावी. अमेरिकेची राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायला सज्ज आहोत अशा थाटात राऊत दंड थोपटतात. त्यांनी दंडही चेक करावे आणि त्यांची क्षमताही चेक करावी, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेटी होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असे पाटील यांनी सांगितले .