सोलापूर : तंबाखू खाल्याने आजार येतो आणि मृत्यूही होत असल्याचे प्रमाण वाढत आहे. मानवी जीवनाला तंबाखू हानीकारक असल्याचे नागरिकांना पटवून द्या. शिवाय एडस् हा आजारही बरा न होणारा आहे. मात्र योग्य उपचार घेतले तर हा आजार आटोक्यात ठेवता येतो, याविषयी जनमानसात जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समिती, जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समिती आणि स्त्रीभ्रूण हत्येला प्रतिबंध घालण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) दक्षता पथक समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी शंभरकर यांनी तिन्ही समितीचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्या नागरिकांना तंबाखूचे होणारे दुष्परिणाम, कॅन्सरसारखे आजार याची माहिती द्यावी. प्रत्येक शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुखांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखू न खाण्याबाबत सूचना द्याव्यात.
जिल्ह्यात एडस संसर्ग रूग्णांचे प्रमाण वाढू नये, यासाठी नियमित तपासण्या करा. सामाजिक संस्थांच्या मदतीने तपासण्यांचे प्रमाण वाढवा. एडस् रूग्णांवर योग्य उपचार करून औषधे कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. रूग्णांना असलेल्या सोयी-सुविधा देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
गरोदर महिलांच्या कुटुंबाचे समुपदेशन करा
प्रत्येक गरोदर महिलेची एचआयव्ही तपासणी केली जाते. गरोदर महिला एडसग्रस्त आहे हे निदर्शनाला आले तर तिच्यावर त्वरित एआरटीनुसार उपचार सुरू केले जातात. यामुळे बाळाला धोका पोहोचण्याचे प्रमाण कमी होते. त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करून एचआयव्ही तपासणी करण्यास प्रवृत्त करून उपचार सुरू करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
खाजगी आणि शासकीय ब्लड बँका, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठ यांनी रक्तसंकलन करून यातील 10 टक्के रक्तसाठा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाला (सिव्हील हॉस्पिटल) द्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. यानुसार काही ब्लड बँका रक्ताचा पुरवठा करतात, मात्र त्यांनी रक्त संकलन केल्यानंतर लगेच द्यावे, म्हणजे त्याचा गरीब, गरजू रूग्णांना वापर होईल. याबाबत ब्लड बँकाशी चर्चा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात 185 तर सोलापूर शहरात 194 सोनोग्राफी केंद्र सुरू आहेत. सोनोग्राफी केंद्रांची तपासणी काळजीपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण करावी. बेकायदेशीरपणे प्रसूतीपूर्व सोनोग्राफी करून स्त्रीभ्रूण हत्या करीत असणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई करावी. जिल्ह्यात स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याची माहिती सामान्य नागरिकांनी 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले.
सोनोग्राफी सेंटरची नोंदणी आता ऑनलाईन होणार असून याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे नोंदणी आणि नुतणीकरण ऑनलाईन होईल, याविषयी डॉ. कुलकर्णी यांनी माहिती दिली.