राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात टाकलेल्या हातभट्टयांवरील छाप्यात अकरा गुन्ह्यात 130 लिटर हातभट्टी दारू सह दहा हजार 990 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले.
सविस्तर वॄत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण राज्यभरात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे, त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने शनिवारी जिल्हाभर राबविलेल्या मोहिमेत अकरा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत सोलापूर विभागाचे अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा, कवठे तांडा, भोजप्पा तांडा व शिवाजीनगर तांडा या ठिकाणी सकाळच्या सुमारास धाडी टाकल्या. या धाडीत एकूण आठ गुन्ह्यात शंभर लिटर हातभट्टी दारू व 9600 लिटर रसायन असा एकूण दोन लाख 44 हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या छापासत्रात निरीक्षक राहुल बांगर यांच्या पथकाने भोजप्पा तांडा येथील सुमन गुरूनाथ राठोड, वय 47 वर्षे या महिलेच्या ताब्यातून अकराशे पन्नास लिटर रसायन जप्त केले. एका अन्य गुन्ह्यात घोडा तांडा येथे हजार लिटर रसायन व 100 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने भोजप्पा तांडा येथील अश्विनी रमेश राठोड वय 23 वर्षे या महिलेच्या ताब्यातून चौदाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले तसेच कवठे तांडा येथील एका हातभट्टी ठिकाणावरून चारशे लिटर रसायन जप्त करून नाश केले. दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने घोडा तांडा येथील दोन हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून बाराशे लिटर रसायन जप्त केले.
दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस राजेंद्र वाकडे यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील विझोरी व चव्हाणवाडी या ठिकाणी छापा टाकून 840 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले या गुन्ह्यात एकूण बावीस हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रीमती मयुरा खेत्री यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या ठिकाणी छापा टाकून 30 लिटर हातभट्टी दारू व 550 लिटर रसायन असा एकूण 14800 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात एकूण 11 गुन्ह्यात 130 लिटर हातभट्टी दारू व दहा हजार 990 लिटर गुळ मिश्रीत रसायन असा एकूण दोन लाख 81 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक अक्षय भरते, उषाकिरण मिसाळ, मानसी वाघ, सुरेश झगडे, कृष्णा सुळे, मयुरा खेत्री, राजेंद्र वाकडे, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, आवेज शेख, जीवन मुंढे, जवान इस्माईल गोडीकट ,योगीराज तोग्गी, अनिल पांढरे, अण्णा कर्चे, किरण खंदारे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, गजानन जाधव, तानाजी जाधव, प्रकाश सावंत, वाहनचालक रशीद शेख, मारुती जडगे व दीपक वाघमारे यांनी केली.
आवाहन
सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरात कुठेही हातभट्टी दारू विक्री, निर्मिती किंवा वाहतूक होत असल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्याबाबत अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक यांनी आवाहन केले आहे.