येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी संदर्भात केलेल्या विधानावरून आता, राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडले ते देखील चुकीचं होते , असे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी विधान केलेले आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.“आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती हे राहुल गांधी यांनी आता मान्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी ज्या चुकीच्या, तथ्यहीन आणि तिरस्करणीय टिप्पण्या केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी. नाहीतर काही वर्षानंतर याचीही जाणीव त्यांना होईल आणि मग माफी मागितली जाईल, पण नंतर देशातील जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधी माफी मागता – मागता थकून जातील पण त्यांच्या गुन्ह्यांची मोजणी संपणार नाही.” अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.