येस न्यूज मराठी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या खालापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा २ किमी पर्यंत गेल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुण्याला जाणाऱ्या मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही वाहनं टोल न घेता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लक्ष्मीपूजन शनिवारी पार पडलं. सोमवारी पाडवा आणि भाऊबीज असे दोन्ही सण आहेत. त्यामुळे पुण्यात जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे.
एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहनं सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. खालापूर टोल नाक्यावरुन पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या टोल न घेता सोडल्या गेल्या त्यानंतर ही वाहतूक कोंडी काही प्रमाणात आटोक्यात आली.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात एप्रिलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कार किंवा जीपसाठी २३० ऐवजी २७० रुपये मोजावे लागतात. तर मिनी बसला ३५५ ऐवजी ४२० रुपये द्यावे लागतात. मोठ्या लक्झरी बससाठी ६७५ ऐवजी ७९७ रु. टोल आकारला जातो. सर्व प्रकारच्या वाहनांचे टोल दर हे ४० ते १२० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.