सोलापूर : योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. मार्शल आर्टला योगाची जोड दिली की लहान बालकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन रुद्र अॅकॅडमी ऑफ मार्शल आर्ट व योग संस्थेच्या संचालिका संगीता सुरेशजी जाधव यांनी केले.
२१ जून रोजी होणाऱ्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला ४७ दिवस बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्यूरो, सोलापूर आणि रुद्र अॅकॅडमी ऑफ मार्शल आर्ट व योग संस्था यांचे सयुंक्त विद्यमाने दिनांक ५ मे २०२३ रोजी शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर येथे आयोजित एक दिवसीय योग व मार्शल आर्ट अभ्यासाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर भारत सरकारचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण, वरिष्ठ योगाचार्य मनमोहन भुतडा, सहायक क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
जाधव म्हणाल्या की, दिवंगत युद्ध व योगाचार्य सुरेशजी जाधव यांनी रचलेल्या प्रज्ञासंवर्धन योगाभ्यासाच्या माध्यमातून बालकांचे ज्ञानेंद्रिये क्षमता संवर्धन आणि मेंदूच्या डाव्या व उजव्या भागांची क्षमता विकसित होते. तसेच आकलन, ग्रहण, स्मरण विश्लेषण व सृजन शक्तीचा विकास करण्यास मदत होते. योग व मार्शल आर्टचे नियमित सरावाने बालकांमध्ये भय, शीघ्रकोप, चिंता, आळस आणि चंचलता यांचा नाश होऊन प्राणक्रियांची क्षमता वाढते.
चव्हाण म्हणाले की मार्शल आर्टमध्य शारीरिक लवचिकता आणि स्नायूं बळकट असणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी योगसाधना नियमित करत राहणे महत्वाचे आहे. आज जगामध्ये योग साधनाचे फार महत्व वाढत आहे. आपल्या माध्यमातून आपल्या पालकांपर्यंत योगविषयक माहिती पोहचवा.
भुतडा म्हणाले नियमित ध्यान आणि प्राणायाम केल्याने शारीरिक व मानसिक स्थिरता मिळते. त्यामुळे मार्शल आर्ट मध्ये प्रगती करण्यास सहायता होते.
यावेळी मार्शल आर्टमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे जापनीज भाषेतील प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक मिहिर सुरेश जाधव, आकाश झळकेनवरु, साहील जाधव, प्रतिज्ञा दळवी आणि संस्कृती देशपांडे यांनी परिश्रम घेतले.