सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या संविधान उद्देशिकेच्या स्तंभास कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विद्यापीठ कॅम्पसमधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान संविधानाचा जयघोष करत संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली.
यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी संविधान मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधान दिनाच्या उपक्रमांमुळे विद्यापीठ परिसर देशभक्तीच्या आणि लोकशाहीच्या मूल्यांनी भारून गेला होता.


