पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. वंदे मातरम् या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अगरवालवर शाईफेकीचा प्रयत्न केला. विशाल अगरवालला पुणे सेशन्स कोर्टात हजार करण्यात आलं असून यावेळी कोर्ट परिसरात त्याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. अपघातानंतर पसार झालेल्या विशाल अगरवालला सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली
पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील चालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय मंडळासमोर बुधवारी पुन्हा हजर करण्यात आले. पोलिसांनी लावलेल्या कलमांवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, बाल न्याय मंडळ साडेचार वाजताच्या सुमारास निकाल देण्याची शक्यता आहे. भरधाव आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगर परिसरात घडली होती.
यापूर्वी बाल न्याय मंडळाने या युवकाला जामीन मंजूर केला होता. या युवकाने येरवडा वाहतूक पोलिसांसोबत पंधरा दिवस वाहतूक नियमनाचे काम करावे, त्याने अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा आणि मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घ्यावे, अशा अटी-शर्ती न्यायालयाने घातल्या होत्या. पुण्यासह देशभरात या निकालावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यानंतर पोलिसांनी या कार चालकवर ‘कलम ३०४ ए’ (निष्काळजीपणे केलेल्या कृत्यामुळे झालेला मनुष्यवध) हे वगळून त्याऐवजी ‘कलम ३०४’ (खून या सदरात न मोडणारा सदोष मनुष्यवध) हे कलम लावून पुन्हा बाल न्याय मंडळात हजर केले.