मुंबई : व्होट जिहादचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने या मुद्द्यावर प्रचारात अधिक भर दिला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समुदायाने महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, असा आरोप महायुतीचे नेते करतात. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा आरोप केला जात आहे. आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडीओचा दाखल देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, व्होट जिहादचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मतदान केले. एखाद्या मतदारसंघात विशिष्ट समाजाने एखाद्या पक्षाला मतदान केले तर तो त्यांचा अधिकार आहे. पुण्यामध्ये काही मतदारसंघात एक विशिष्ट समाज भाजपाला मतदान करतो. आम्हाला त्याची सवय झाली आहे. कारण ते नेहमीच तसे मतदान करतात. याचा अर्थ तो काही जिहाद होत नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन त्यांची विचारधारा दिसते.