सीटू चा स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित मोहीम
24 एप्रिल रोजी वीज ग्राहकांचा अभूतपूर्व मोर्चा वीज महावितरण वर धडकणार – कॉ. आडम मास्तर यांची घोषणा
सोलापूर दिनांक – सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे. तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे. या संबंधी निविदा मंजूर करण्यात आलेली आहेत व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहिम सुरु होईल असे स्पष्ट दिसून येत आहे. वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीजदर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीजदरवाढीच्या रुपाने १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे.

त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणूनच ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही या स्मार्ट/प्रीपेड मीटर्सना संपूर्ण विरोध आहे. वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याची मोहीम हाती घेतली असून येत्या 24 एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती सीटू ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
बुधवार दिनांक 26 मार्च रोजी लष्कर भागातील कामगार चौक येथे सीटू चे राज्य महासचिव ॲड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी ॲड.अनिल वासम यांची उपस्थिती होती.
सदर ग्राहकांच्या अर्जात आहोत.
१. वीज कायदा २००३ मधील अधिनियम क्रमांक ४७ (५) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटर ची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत. कंपनी अघोषित सक्ती करुन ग्राहकांच्या या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपूर्ण उल्लंघन करीत आहे, हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ग्राहक म्हणून आमच्या हक्कानुसार आमचा सध्याचा आहे तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.
२. महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडर्सनुसार खर्च १२,०००/- रु. प्रति मीटर याप्रमाणे आहे. मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रति मीटर ९००/-रु. अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी १११००/- रु. प्रति मीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे. या कर्जास आमची मान्यता नाही व आम्ही हा मीटर घेणार नाही. त्यामुळे हा खर्च आमच्यावर लादता येणार नाही. या खर्चामुळे या कर्जावरील व्याज, पसारा व संबंधित खर्च इ. कारणासाठी वीज दरामध्ये वाढ होणार आहे. ही वाढ अंदाजे किमान ३० पैसे प्रति युनिट व अधिक होईल. आम्ही हा मीटर वापरणार नसल्यामुळे या वाढीव दराचा कोणाताही बोजा आमच्यावर लावता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- माहितीसाठी आमच्या अंतिम बिलाची प्रत सोबत जोडली आहे. कृपया आमच्या वरील मागण्यांची नोंद घ्यावी आणि याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावी ही विनंती. सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अशा सक्तीच्या जोडणीला प्रखर विरोध व आंदोलन करु याची कृपया नोंद घ्यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी सनी शेट्टी, बालाजी गुंडे, मोहन जंगम, राजू नाईक, बालाजी देवेकर, अंबादास उपलवार, अक्षय चन्नेपगुलु, चिदानंद चन्नेपागुल, नागेश म्हेत्रे, किशोर म्हेत्रे, सागर अनबी, लक्ष्मण मिसालोळू
आदींनी परिश्रम घेतले आहे.