येस न्युज मराठी नेटवर्क : मृदा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच लोकांना माती परीक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी, मातीच्या गुणवत्तेची जाणीव आणि मातीच्या संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती व्यवस्थापनाकडे लक्ष जावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीमुळे दिवसेंदिवस मृदा प्रदूषण आणि जमीन नापिक होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.अन्न आणि कृषी संघटनेकडून 2013 मध्ये 68 व्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये जागतिक मृदा दिन साजरा करण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. शेवटी सभेने 2014 मध्ये 5 डिसेंबर हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा उद्देश पर्यावरणासाठी आणि निसर्गचक्रासाठी मातीचा ऱ्हास होणे हा एक मोठा धोका आहे. जागतिक स्तरावर ही एक मोठी समस्या मानली जाते. म्हणून 5 डिसेंबर हा दिवस माती संबंध समस्या, त्यातली आव्हाने, मातीचे संवर्धन इत्यादी गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
त्यानुसार ह्या वर्षीच्या जागतिक मृदा दिनानिमित्त ‘सॉईल: व्हेअर फुड बिगीन’ म्हणजेच “माती जेथून अन्नाची सुरुवात” हे घोषवाक्य घेऊन साजरा करण्यात आला. माती व्यवस्थापनातील वाढती आव्हाने सोडवण्यासाठी आणि मातीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच मातीमध्ये योग्य प्रकारे सुधारणा होण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमंगल समूहाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोकमंगल कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने दि 5 डिसेंबर ते 10 डिसेंबर यादरम्यान 25 गावांमध्ये माती आणि पाणी परीक्षणावरती जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला सर्व गावातील शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी विषय विशेषज्ञ म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयातील मृदा विभाग प्रमुख डॉ. विशाल दळवी व कृषी विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. तृप्ती राठोड आणि विषय विशेषज्ञ डॉ. गणेश पवार, प्रा तुषार नामदे प्रा. कृष्णाजी टिंगरे प्रा. स्मिता धायगुडे त्याचबरोबर विशेष सहाय्य डॉ. अमोल शिंदे डॉ. सचिन फुगे व प्रा. नवनाथ गोसावी यांचे मिळाले. सर्व कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी यांचे सुद्धा कार्यक्रम व्यवस्थापनामध्ये सहकार्य लाभले. अशाप्रकारे हा सप्ताह यशस्वीरित्या पार पडला.