हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांचे कौतुक करत त्यांना पाठींबा देणारे उत्तम शिक्षक म्हणजे श्रीराम पुजारी. प्रा. पुजारी यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगिण दिशा दाखविण्याचे काम केले. ते ज्ञान देण्याचे वेड असणारे शिक्षक होते. श्रीराम पुजारी यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा जपला. त्यांचे व्यक्तीमत्व रत्नासारखे लखलखते होते जे कायम प्रकाश देत राहिले. ते सोलापूरचा अभिमान होते, पण त्यांच्या विद्वत्तेची कदर महाराष्ट्राने केली नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजधुरिण प्रा. श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज (दि. 25) रोजी श्रीराम पुजारी यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीच्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर ‘माझ्या आठवणीतले पुजारी सर’ याविषयी आठवणी सांगताना सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यात प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, लेखक अच्युत गोडबोले यांचा सहभाग होता. लोकमान्य टिळक सभागृहात जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, माझा व पुजारी सरांचा संपर्क मी संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकत असताना आला. माझ्या अशुद्ध वाणीवर सरांनी कधीही टीका केली नाही; परंतु त्याविषयी मला प्रेमाने समजावून सांगितले व माझी भाषा शुद्ध केली. दबलेल्या वर्गातील मुलांना मदतीचा हात पुढे करणारे ते उत्तम व्यक्ती व शिक्षक होते.
गुण बंडखोरीचा पण वागण्यात पारदर्शीपणा : डॉ. जब्बार पटेल
माझ्या संस्कारक्षम शाळकरी वयातच मला पुजारी सरांचा सहवास लाभला असे सांगून डॉ. जब्बार पटेल म्हणाले, सुमारे चार वर्षे मी सरांच्या घरातच वाढलो. त्या काळात सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना नवकवितेची ओळख करून दिली आणि साहित्य व संस्कृतीचे भान जागृत केले. ते पुढे म्हणाले, जाती-पातीचे बंधन न पाळता सर आणि बाईंनी माझ्यावर पोटच्या मुलापेक्षाही अधिक प्रेम केले. सरांमध्ये बंडखोरीचा गुण होता तसेच त्यांच्या वागण्यात अत्यंत पारदर्शीपणा देखील होता. संस्कार देण्याबरोबरच संस्कार देणाऱ्या व्यक्तींचा परिचय मला पुजारी सरांमुळेच झाला.
कलेवर प्रेम करत जगण्याचा वस्तुपाठ म्हणजे पुजारी सर : अच्युत गोडबोले
अच्युत गोडबोले म्हणाले, पुजारी सर आमच्या घरी आले आणि आमच्या कुटुंबाचा भागच बनले. त्यांनी मला पुस्तकी शिक्षण दिले नाही तरी कलेवर प्रेम करण्याचे संस्कार त्यांच्याकडूनच मिळाले. ते मुला गुरुस्थानी होते. सरांमुळेच अनेक दिग्गज कलाकारांचे पाय आमच्या घराला लागले. आयुष्याचा रस घेत कसे जगायचे हे मी सरांकडूनच शिकलो. कलेवर प्रेम करत कसं जगावं याचा वस्तुपाठ म्हणजेच पुजारी सर होत.
या प्रसंगी श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जोशी, कार्याध्यक्ष डॉ. नवनीत तोष्णिवाल, सचिव ललिता दातार, कोषाध्यक्ष किरण जोशी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रा. केशव शिंदे, प्रा. सुलभा पिशवीकर, प्रा. पुष्पा आगरकर, डॉ. श्रीकांत कामतकर उपस्थित होते.