मुंबई : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला महत्त्वाची सूचना केली आहे. भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल बोलत होते.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, “एकीकडे देशाचं चलन कमकुवत होत आहे तर अर्थव्यवस्थाही दोलायमान परिस्थितीत आहे. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा ईश्वराची आठवण होते. आपण दिपावलीला लक्ष्मीपूजन केलं. यावेळी आपण लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली. अत्यंत गंभीर परिस्थितीतही आपण देवावर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत माझं आवाहन आहे की, भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे फोटो छापावेत.” यावेळी केजरीवाल म्हणाले की, “नोटेवर गांधीजींचा फोटो तसाच ठेवावा, पण मागच्या बाजूला देवांचा फोटो लावावा.”