सोलापूर, दि. 27- यंदाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. 34 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व संस्थांचालक, प्राचार्य व शिक्षकांनी दक्ष राहून योगदान द्यावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन, कुलसचिव योगिनी घारे, वक्ते मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मंदार भानुशे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी यांनी करून दिला.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना एका बहु विद्याशाखीय पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. यामध्ये विविध विषय घेऊन विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करता येईल. त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संलग्नित महाविद्यालयांनी देखील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नियोजन करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
प्र-कुलगुरू प्रा. बिसेन म्हणाले की, विज्ञान, संसाधने, गरजा हे सर्व अपेक्षित बदल गृहीत धरून दीर्घकाल चिंतन करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्यात आले आहे. विद्यार्थी केंद्रित व भारत देश केंद्रित हा शैक्षणिक धोरण असून राष्ट्राच्या वैभव व उन्नतीसाठी बदल घडवणारा शैक्षणिक धोरण आहे. आत्मनिर्भर विद्यार्थी तयार करणे, विद्यार्थ्यांना आवडीनुसार विषय देणे, सामाजिक जाणीवा जागृत करणे, समान श्रेयांक पद्धती, मातृभाषेतून शिक्षण अशा या शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्ये आहेत. यंदाच्या वर्षीपासून हा शैक्षणिक धोरण लागू होणार असून वैभवशाली पिढी घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. भानुशे यांनी परकीय आक्रमणापूर्वी भारत देशातील परिस्थितीचा व प्रगतीचा आढावा घेत भारतीय ज्ञान परंपरा किती महान असल्याचे सांगितले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान-परंपराला दिलेले महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. भौतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक या सर्व गोष्टींचा व विज्ञानाचा सांगड आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे होणारे विकसित बद्दल त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे व प्राध्यापक डॉ. मंदार भानुशे.