मुलाखतीतून उलगडला मकरंद अनासपुरेंचा सामाजिक आणि चित्रपट सृष्टीचा प्रवास
लातूरच्या जनआधार सेवाभावी संस्था आणि तुळजापुरातील वात्सल्य सामाजिक संस्थेला प्रिसीजनचे पुरस्कार
तब्बल दोन वर्ष कोरोनामुळे खंड पडलेल्या प्रिसिजन गप्पांच्या कार्यक्रमाचे यंदा अगदी उत्साहात उद्घाटन पार पडले. प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रिसिजन गप्पा या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. प्रिसिजन गप्पांच्या उद्घाटन समारंभात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दोन संस्थांचा प्रिसिजनच्यावतीने पुरस्कार देऊन देखील गौरव करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम रंगला. ‘नाम’मात्र मकरंद या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगितला. खळखळत हसवत सुरू झालेली ही मुलाखत ऐकताना काही प्रसंगी सोलापूरकरांच्या डोळ्यांच्या पापण्याही पाणावल्या.
प्रारंभी लातूरच्या जन-आधार सेवाभावी संस्थेला यंदाच्या वर्षीचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तुळजापूर येथील वात्सल्य सामाजिक संस्थेला स्व. सुभाष रावजी शहा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर शहरातील कचरा वेचक कष्टकरी समाज घटकांसाठी जन-आधार सेवाभावी संस्था मागील १८ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याचा कौतुक करताना प्रिसिजन फाउंडेशन ने तीन लाख रुपये आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला. मात्र कचरा वेचणाऱ्या कष्टकरी समाजाचे जीवन तंत्रज्ञानाने परिपूर्ण करायचे असल्याने पुरस्काराच्या रकमेपेक्षा तंत्रज्ञानरूपी मदत करावी. अशी भावना जन आधार सेवाभावी संस्थेचे प्रमुख संजय कांबळे यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे जनाधार सेवाभावी संस्थेला देण्यात आलेल्या प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देखील संस्थेत काम करणाऱ्या कचरा वेचणाऱ्या महिलांनी स्वीकारला. प्रिसिजन ने दिलेल्या या सन्मानामुळे कचऱ्याचे सोने झाले. अशी भावना संजय कांबळे यांनी व्यक्त केली. कचरा उचलणाऱ्यांना अस्पृश्य समजलं जातं होतं. मात्र आज आपण त्याचं लोकांना मंचावर बोलावून सेलिब्रेटीच्या हस्ते सन्मान करताय याचा मनस्वी आनंद होतोय. अशी भावना कांबळे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.
त्यानंतर तुळजापुरात वंचित, उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या वात्सल्य सामाजिक संस्थेला स्वर्गीय सुभाष रावजी शहा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एकल महिलांसाठी आत्मनिर्भरता या ध्येयासाठी काम करणाऱ्या वात्सल्य संस्थेला दोन लाख रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद होत असल्याची भावना संस्थेचे प्रमुख उमाकांत मिटकरी यांनी व्यक्त केली.
प्रिसिजन पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या दिलखुलास गप्पांची मुलाखत पार पडली. औरंगाबाद येथील पत्रकार तथा अनासपुरे यांचे मित्र प्रेषित रूद्रवार यांनी मकरंद यांना बोलतं केलं. यावेळी अनासपुरे यांनी आपला सिनेमा ते सामाजिक कार्याचा प्रवास उलगडून सांगितला.
यावेळी औरंगाबादपासून ते मुंबईपर्यंतचा जीवन प्रवास मकरंद अनासपुरेनी दिलखुलासपणे सांगितला. सुरुवातीच्या काळात एकांकिकामध्ये काम करताना घडलेल्या गमतीजमती ऐकताना सोलापूरकर खळखळून हसले. त्याचवेळी मुंबईत कलाकाराना करावे लागणारे कष्ट आपल्या विनोदी शैलीत मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.
