विद्यापीठ आणि यजमान महाविद्यालयाकडून नियोजन
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा “उन्मेष सृजनरंगांचा”युवा महोत्सव हा दि. 10 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वेरी कॉलेज) येथे होणार आहे. संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या लोककला विभागातील भारूड, भजन, लावणी, पोवाडा, शाहिरी जलसा आणि कव्वाली या नवीन सहा कला प्रकारांची नियमावलीही विद्यार्थी विकास विभागाने मागील शनिवारी सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठविली आहे. आता युवा महोत्सवात भारतीय लोककला आणि पाश्चात्यासह ३९ वैयक्तिक व सांघिक कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने आणि यजमान महाविद्यालयाकडून चोख नियोजन सुरू आहे.
सर्वसाधारण विजेतेपदासाठी लोककलेसह सर्व वैयक्तिक व सांघिक ३९ कलाप्रकाराचे गुण समान पध्दतीने विचारात घेतले जाणार आहेत. युवा महोत्सवासाठी जवळपास ५० परीक्षकांना विद्यापीठाने निमंत्रित केले आहे. त्या-त्या कलाप्रकाराची जाण असणारे सर्व तज्ज्ञ परीक्षक या महोत्सवासाठी असणार आहेत. या कलाप्रकारांचे परीक्षण पारदर्शी होण्याच्या दृष्टीने नियमावली दुरूस्त करून तिचे नियम स्पष्ट केले आहे. महोत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी आवश्यक असणारी मंच, निवास, भोजन, मंडप व्यवस्था याची तयारी यजमान महाविद्यालयाची सुरू आहे.
महोत्सवाचे उद्दघाटन मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्राध्यापक,लोककलेचे अभ्यासक आणि महाराष्ट्रतील सुप्रसिध्द लोककलावंत,तसेच ज्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेला भारतीय पातळीवर पोहचवले असे डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते होणार आहे. युवा महेत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे पाहुणे म्हणून भारतीय चित्रपट क्षेत्राला नवा आशय देणाऱ्या मोठ्या कलावंताला निमंत्रित करण्यासाठी विद्यार्थी विकास विभाग आणि यजमान महाविद्यालय प्रयत्नशील आहे.
संगीत, नृत्य, नाट्य, ललित, वाड्मय आणि लोककला अशा सहा गटातील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न सुरू आहे. हा महोत्सव देखणा होण्यासाठी आवश्यक असणारी सर्वप्रकारची पूर्वतयारी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. युवा महोत्सवातील इतर कलाप्रकारांप्रमाणेच विद्यार्थी कलावंतांनी लोककला प्रकारातही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन प्र कुलगुरू डॉ. गौतम कांबळे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे तसेच यजमान कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले आहे.