सोलापूर जिल्ह्यातील आठ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांमधील वाचनसंस्कृती वाढावी या उद्देशाने प्रिसिजन समूहाच्या सीएसआर निधीतून ‘पासवर्ड’ या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. युनिक फिचर्स (पुणे) यांच्या सहकार्याने होत असलेल्या या उपक्रमाचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील आठ शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, युनिक फिचर्सचे (पुणे) संचालक आनंद अवधानी यांच्या प्रमुख उपस्थितीत अरण (ता. माढा) येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
जि. प. प्रा. शाळा अरण (ता. माढा), जि. प. प्रा. शाळा मोडनिंब (ता. माढा), जि. प. प्रा. शाळा पापरी (ता. मोहोळ), जि. प. प्रा. शाळा अंबिका नगर (ता. मोहोळ), जि. प. प्रा. शाळा बेलाटी (ता. उत्तर सोलापूर), जि. प. प्रा. शाळा अंबिका नगर (बाळे), सोनामाता प्रशाला (लिमयेवाडी), श्रीमती कमला नेहरू प्रशाला (जुळे सोलापूर) या आठ शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या एक हजार विद्यार्थ्यांना ‘पासवर्ड’ उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
त्याबाबत युनिक फिचर्सचे सचिन घोडेस्वार आणि सानिका घळसासी यांनी पासवर्ड कॅम्पेनबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, स्नेहा सपकाळ, सर फाउंडेशनचे सदस्य शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय आहे ‘पासवर्ड’ उपक्रम ?
शालेय विद्यार्थ्यांमधील वाचनसंस्कृती वाढावी, त्यांना आपले विचार सुसंगतपणे मांडता यावेत, योग्य प्रकारे अभिव्यक्त होण्याचे संस्कार त्यांच्यावर व्हावेत, त्यांच्यातील संवेदनशीलतेत व शब्दसंग्रहात वाढ व्हावी, कल्पनाशक्तीचा विकास व्हावा, अवांतर वाचनाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य विकास व्हावा हा ‘पासवर्ड’ या उपक्रमामागचा हेतू आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षातून तीन त्रैमासिके वाचायला मिळतील. त्यामध्ये मूल्यात्मक गोष्टी, गाणी, कोडी, माहितीपूर्ण लेख यांचा समावेश असेल.