· पं. दिलीप काळे यांचे संतूर वादन
· पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन
· “मोहिनी” – सहा महिला कलाकारांचा एक अभिनव कार्यक्रम
· पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचा शास्त्रीय – उपशास्त्रीय गायनचा स्वराविष्कार
सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने येत्या २३ आणि २४ एप्रिल २०२२ रोजी ’प्रिसिजन संगीत महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष असून हुतात्मा स्मृति मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन यतिन शहा उपस्थित होते.
संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या, कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंध मुक्तीनंतर प्रिसिजनचा हा पहिलाच ऑफलाईन कार्यक्रम होत आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दि.२३ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात प्रख्यात संतूर वादक पं. दिलीप काळे यांचे संतूर वादन होईल. त्यांना तबल्यावर रामदास पळसुळे हे साथ करतील. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होईल. त्यांच्या साथीला भारत कामत ( तबला ), सुयोग्य कुंडलकर ( हार्मोनियम), प्रसाद जोशी ( पखवाज ) आणि नागेश भोसेकर ( तालवाद्य ) यांची साथ असेल. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर त्यांचा स्वराविष्कार ऐकायला मिळणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि.२४ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात एक अभिनव कार्यक्रम ऐकायला आणि पाहायला मिळेल. “मोहिनी” असे या कार्यक्रमाचे नाव आहे. यात सहा महिला कलाकार असून सितार, गायन, कथ्थक यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळेल. यात सहाना बॅनर्जी (सितार), रुचिरा केदार (गायन), सावनी तळवलकर (तबला), अदिती गराडे (हार्मोनियम), शीतल कोळवलकर (कथ्थक), अनुजा बरुडे (पखवाज) यांचा सहभाग असणार आहे. असा प्रयोग पहिल्यांदाच आपल्याकडे होत आहे.
रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सत्रात किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचे शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन होईल. पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचा स्वराविष्कार अनुभवणं ही रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी असेल.त्यांना तबल्यावर अविनाश पाटील, हार्मोनियमवर रवींद्र कातोटी, मनोज भांडवलकर ( पखवाज ) आणि विश्वास कळमकर ( तालवाद्य ) हे साथ करतील.
पुण्यातील ’सवाई गंधर्वच्या धर्तीवर सोलापूरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा या उद्देशाने प्रिसिजन फाउंडेशन मागील ६ वर्ष पासून प्रयत्नशील आहे. सोलापूरातील रसिकश्रोत्यांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवता यावी हाच प्रयत्न आहे. यंदाच्या वर्षीही सोलापूरकरांना या महोत्सवाचा आनंद निःशुल्क घेता येईल. त्यासाठी निःशुल्क प्रवेशिका (फ्री पासेस) सोमवार दि. १८ एप्रिल पासून हुतात्मा स्मृति मंदिरात सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उपलब्ध होतील. रसिकांनी आपले नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात. त्यावर आसन क्रमांक नसेल. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर बसण्याची सोय आहे.
प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक ६.२५ वाजता कार्यक्रम सुरू होईल .रसिकश्रोत्यांनी जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.