विज्ञानशिक्षणात सोलापूर जिल्हा बनणार रोल मॉडेल !
सोलापूर : प्रिसिजन उद्योगसमूहाच्या सीएसआर निधीतून सोलापूर शहरजिल्ह्यातील पाच शाळांमध्ये अत्याधुनिक लघुविज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणाऱ्या या उपक्रमामुळे विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीला बळ मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी व्यक्त केला.
सोनामाता प्रशाला (सोलापूर), स्व. दाजीकाका गोडबोले विद्यालय (कामती ता. मोहोळ), ज्ञानसाधना प्रशाला (टाकळी ता. दक्षिण सोलापूर), सहकारमहर्षी गणपतराव साठे जि. प. शाळा (माढा), अंबिका विद्यालय (शिरापूर ता. मोहोळ) या पाच शाळांमध्ये या अत्याधुनिक लघुविज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
यासाठी विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन व नवे प्रयोग करणाऱ्या मुंबई येथील ‘स्टेम लर्निंग’ या संस्थेने सहकार्य केले आहे. या पाच शाळांमधील गणित व विज्ञान या विषयांचे ३० पेक्षाही अधिक शिक्षक तसेच इयत्ता पाचवी व त्यापुढील इयत्तेतील दोन हजारपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच या शाळांच्या आजूबाजूच्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल.
या लघुविज्ञान केंद्रांचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजी सोनामाता प्रशालेत पार पडला. यावेळी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, सोनामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा अत्रे, माध्यमिकचे मुख्याध्यापक विनोद शिंदे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुवर्णा अत्रे, सर फाउंडेशनचे समन्वयक सिद्धाराम माशाळे यांच्यासह पाचही शाळांमधील विज्ञान व गणित विषयांचे शिक्षक उपस्थित होते.
लोकार्पण समारंभानंतर शिक्षकांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली. त्यामध्ये स्टेम लर्निंगचे राहुल गवई यांनी लघुविज्ञान केंद्रातील प्रोजेक्ट मॉडेल्स वापरून विद्यार्थ्यांना कसे शिकवावे याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले.
लघुविज्ञान केंद्राची वैशिष्ट्ये !
प्रिसिजनने बनविलेल्या लघुविज्ञान केंद्रात विज्ञान व गणित या विषयांशी संबंधित ८० प्रोजेक्ट मॉडेल्सचा समावेश आहे. त्यापैकी २३ मॉडेल्स ही इलेक्ट्रिकवर चालणारी आहेत. न्यूटन चकती, तरंगता चेंडू, जडत्वाचा नियम, पिसाचा मनोरा, कप्पी यंत्र, मानवी सांधे, सौर ऊर्जा, परावर्तनाचा नियम यांसह असंख्य अनोख्या मॉडेल्समुळे विद्यार्थ्यांना विज्ञानामधील विविध संकल्पना मुळातून समजणार आहेत.