कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी मानले प्रिसिजनचे आभार..
सोलापूर – प्रिसिजन कॅमशॉफ्ट लि., सोलापूर यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत एका आधुनिक व वातानुकूलित 25 आसनी बसची देणगी देण्यात आली. विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमात या बसचा चावीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना प्रिसिजन कॅमशॉफ्ट लि. चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी बसची चावी सुपूर्द केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच अभ्यासभ्रमंतीसाठी ही बस मोठा हातभार लावणार आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी इतरत्र जाण्यासाठी या बसचा मोठा उपयोग होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बसची देणगी देण्यात आल्याने प्रिसिजन कंपनीचे कुलगुरु डॉ. महानवर यांनी यावेळी आभार मानले. त्याचबरोबर सोलापूर विज्ञान केंद्राला देखील प्रिसिजन फाउंडेशनने मदत करावी, असे अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रिसिजनच्या सुहासिनी शहा यांनी सांगितले की, शिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात योगदान देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही बस उपयुक्त ठरेल, अशी आमची खात्री आहे.

या बसच्या मदतीने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासभ्रमंती, क्रीडा स्पर्धा, संशोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध होतील. तसेच, विद्यापीठाचा सामाजिक व शैक्षणिक दर्जाही उंचावण्यास या उपक्रमाचा मोलाचा हातभार लागेल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, अधिसभा सदस्य ऍड. मल्लिनाथ शहाबादे, प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, डॉ. राजेश गुराणी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी केले.