राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे पुण्यातील खराडी परिसरात रेव्ह पार्टीमध्ये आढळून आले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष बंगाळे यांनी खळबळजनक दावे केले आहेत. खेवलकर यांच्यावर पूर्वनियोजित पद्धतीने अडकवण्याचा दोन वेळा प्रयत्न केले गेले होते. हा संपूर्ण प्रकार बनावटी असल्याचा दावा ठोंबरे यांनी केला आहे.
या प्रकरणी येथील हॅकर मनीष बंगाळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना कॉल करून त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते. त्यानंतर या घटनास्थळी छापेमारी करण्यात आली, असा दावा मनीष बंगाळे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या तांत्रिक बाबी माझ्या समोर आल्या आहेत. त्यांची माहिती मी गोळा केली आहे. त्यानुसार या प्रकरणात खेवलकर यांना स्पष्टपणे अडकवण्यात आले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता. त्यांना तिथे बोलावण्यात आले होते आणि ते जाळ्यात अडकले, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
या प्रकरणी रेव्ह पार्टीशी खेवलकर यांचा कोणताही संबंध नाही. पार्टीतील लोकांनाही ते ओळखत नाहीत. यापूर्वी पार्टीतील लोकांच्या संपर्कात देखील ते नव्हते. एक-दोन दिवसात पुणे पोलिसांना मी या सर्व गोष्टी सांगणार आहे. पुणे पोलिसांनी चौकशी केली तर प्रांजल खेवलकर हे या प्रकरणी रेव्ह पार्टीशी त्यांचा कोणताही संबंध नाही, हे समोर येईल. खेवलकर यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि इतर गोष्टी तपासून पाहिल्या तर त्यांच्या विरोधात कट रचला गेला, हे स्पष्ट होईल, असा दावा देखील मनीष बंगाळे यांनी केला आहे.