सोलापूर : राज्यातील प्रसार माध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्यासाठी राज्य शासनाची राज्यस्तरीय अधिस्वीकृती समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी सोलापूर ‘सकाळ’चे शहर बातमीदार प्रमोद बोडके यांची निवड झाली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केला आहे.
राज्य शासनाच्या या समितीत राज्यातील एकूण २७ पत्रकारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही प्रमोद बोडके सध्या कार्यरत आहेत. राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या कोट्यातून त्यांची या समितीवर निवड झाली आहे. बोडके यांनी यापूर्वी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे. समितीत निवड झालेल्या २७ जणांमधून समितीचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या राज्यस्तरीय समितीमध्ये पुणे सकाळचे शरद पाबळे यांचाही समावेश आहे. राज्य शासनाने विभागीय समितीही गठित केली असून औरंगाबादच्या समितीत साम टि. व्ही. चे डॉ. माधव सावरगावे, कोल्हापूरच्या समितीत सकाळचे निखिल पंडितराव यांना संधी मिळाली आहे. आज अधिस्वीकृती
राज्यातील पात्र पत्रकारांना शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या अधिस्वीकृती पत्राच्या माध्यमातून मोफत एस. टी. प्रवास, सवलतीच्या दरात शासकीय विश्रामगृहात राहण्याची सुविधा यासह इतर लाभ दिले जातात. विविध माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाची अधिस्वीकृती पत्रे देण्यासाठी राज्य व विभागस्तरीय समिती काम करते. राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समित्यांमधील सदस्यांना समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी वर्ग एक च्या अधिकाऱ्यांप्रमाणे प्रवासभत्ता व दैनिकभत्ता दिला जातो.