नाशिक : सध्या आगामी लोकसभांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अनेक राजकीय पक्ष तर युतीपेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्धार करत आहेत. महाराष्ट्रात सर्वच पक्ष सक्रिय झाले असून राजकीय, सभा मेळावे जोरदार सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडी देखील येत्या निवडणुकांमध्ये रणशिंग फुंकणार असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते नाशिक दौरा देखील करणार असल्याने नाशिकमधील वंचित बहुजन आघाडी पक्ष कामाला लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणूका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसा सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे गट, शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह सर्वच पक्षांनी गावागावात, शहराशहरात जात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीने देखील महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील मैदानात उतरले असून उद्यापासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यात राज्यातील लातूर, सातारा, बीड आदी जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात ते दौरा करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात त्यांचा दौरा असणार असून ग्रामीण महाराष्ट्रापासून शहरी भागापर्यंत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते आहे.