नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. आज दुपारी साडे चार वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीसांना यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार आहे. तर शेवटच्या फेरबदलात रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांना वगळण्यात आले आहे. अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू आणि पुरुषोत्तम रुपाला यांना बढती देण्यात येण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पीटीआयने भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, पंतप्रधान मोदी जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतील तेव्हा मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. 20 जुलैपासून सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.