मंगळवेढा (प्रतिनिधी): आधुनिक युगातील तंत्रज्ञानाच्या आभासी जगतातील आनंद साजरा करण्यापेक्षा इतरांप्रती आपल्या मनात संवेदनेचा पाझर फुटणे हेच मानवता धर्माचे परमकर्तव्य व मानवी जीवनाची सार्थकता असल्याचे भावनिक उद्गगार अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी काढले आहेत. अखिल भाविक वारकरी मंडळ पंढरपूर विभाग व मंगळवेढा शहर तालुका यांच्यावतीने पंढरपूर तालुक्यातील मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे दिवाळी पाडवा व भाऊबीज सणानिमित्त वृद्ध माता – पित्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत महाराज चवरे, जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग ह.भ.प. ज्ञानेश्वर भगरे, ह.भ.प.शंकर महाराज चव्हाण, ह.भ.प.नवनाथ महाराज मोरे, महिला आघाडी अध्यक्ष संगिता आवताडे, शब्दशिवार साहित्य संघाचे संपादिका कुमुदिना घुले, प्रगतशील बागायतदार सर्जेराव आवताडे, माजी सैनिक दयानंद गायकवाड, दै स्वाभिमानी छावा चे कार्यकारी संपादक महेश वठारे, दामाजी न्यूज सी ई ओ प्रतिक भगरे, शहराध्यक्ष अविनाश नांद्रेकर, अजय आदाटे, सचिन भोसले, निवेदक संतोष मिसाळ, सप्तश्री घुले, सार्थक पवार आदीजण उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे महाराज म्हणाले की, ज्या महाराष्ट्र राज्याच्या पावन भूमीमध्ये मातृ – पितृ देवो भव अशा विधायक संस्कार संकल्पनेचा उदय झाला त्याच महाराष्ट्राच्या शूर – वीरांच्या आणि संतांच्या पवित्र भूमीमध्ये वृद्धाश्रम निर्माण होणे चिंतन करणारी बाब आहे. जे माता – पिता या वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत त्यांनी कोणतीही चिंता उराशी न बाळगता आपण परमात्मा विठ्ठलाच्या सहवासात आला असल्याचे परमभाग्य आपल्या वाट्याला आले असे मनाला सांगावे. आपण आपल्या आयुष्यात सत्याची कास धरून परमार्थ साधावा आणि मानवी जीवनाचे सार्थक करावे असे मार्गदर्शन ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
यावेळी शब्दशिवार दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा ही मान्यवर मंडळी व वृद्ध माता – पिता यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ स्तंभलेखक भिमराव मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले. माजी मुख्याध्यापक राजेंद्रकुमार जाधव यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.