येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टात नोव्हेंबर महिन्यानंतर आता पुढील सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. दोन्ही बाजूने कोणते मुद्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद करणार याची माहितीदेखील देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
कोर्टात आज काय घडले?
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याआधी दोन्ही बाजूने एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे असे घटनापीठाने म्हटले. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील या बाजू मांजू शकतात. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत. हे मुद्दे मोजकेच असावेत असेही कोर्टाने म्हटले.
दोन्ही बाजूने कोणत्या मुद्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हेदेखील निश्चित करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाही. लिखित स्वरुपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते, असेही कोर्टाने म्हटले.