टोकियो: भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताचे हे सहावे पदक ठरले आहे. तर कुस्तीमधील दुसरे पदक आहे. भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले.
बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ ने पराभूत झाला . हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.सामन्यापूर्वी बजरंगच्या वडिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. ”माझा मुलगा आजपर्यंत कधीही रिकाम्या हाताने परतला नाही. संपूर्ण देशाच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. महिनाभरापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तरीही त्याने उपांत्य फेरी गाठली. दुखापतीमुळे तो आक्रमक खेळू शकला नाही”, असे बजरंगच्या वडिलांनी म्हटले होते.बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ ने पराभूत झाला. अलीयेवविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटात बजरंगने एक गुणाने आघाडी घेतली होती. पण, अझरबैजानच्या पैलवानाने बजरंगवर वर्चस्व राखले. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला आहे, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली आहे. उपांत्यपूर्व फेरीत बजरंग ०-१ ने पिछाडीवर होता. यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने इराणी कुस्तीपटूला सामन्याबाहेर फेकून दिले.
टोकियो ऑलिम्पिकध्ये भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, कुस्तीत रवीकुमार दहियाने रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, बॅक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहाने हिने कांस्य तर पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून दिले आहे.
ऑलिम्पिकमधील कुस्तीतील भारताची पदके-
खाशाबा जाधव, कांस्य पदक- १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक
सुशीलकुमार,कांस्य पदक- २००८ बिजिंग ऑलिम्पिक
सुशीलकुमार,रौप्य पदक- २०१२ लंडन ऑलिम्पिक
योगेश्वर दत्त, कांस्य पदक-२०१२ लंडन ऑलिम्पिक
साक्षी मलिक, कांस्य पदक- २०१६ रिओ ऑलिम्पिक
रवीकुमार दहिया, रौप्यपदक २०२० टोकियो ऑलिम्पिक