वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात घाणेरडे राजकारण करण्यात आले. मी मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त आणि ओबीसी समाजाचा नेता आहे. या आरोपांच्या माध्यमातून माझं राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राठोड यांनी केले.
ते मंगळवारी पोहरादेवी येथे आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर दाखवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यामधून तथ्य समोर येईल. मात्र, तोपर्यंत माझी, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची बदनामी करु नका, अशी विनंती संजय राठोड यांनी केली. तसेच फक्त एका घटनेमुळे मला थेटं चुकीचं ठरवू नका, असेही त्यांनी सांगितले.