गुन्हे शाखेची कारवाई : दोन लाखांचे साहित्य जप्त
सोलापूर : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आयपीएल सट्टा घेण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अशा बुर्कीवर कारवाई करण्याची मागणी होत असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्यानं दिलेल्या टीपच्या आधारे शास्त्रीनगर येथे धाड टाकली. तिघा बुकींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले २ लाख ८ हजार ९० रुपयांचे साहित्य जप्त केले.
गफार शब्बीर हिरोली (वय ३६, व्यवसायः मजुरी, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), नितीन प्रदीप शिंदे (वय २८, व्यवसाय: मजुरी, शानदार चौक, शास्त्रीनगर सोलापूर), यासर जावीद शेख (वय ३६, व्यवसाय चालक, रा. सोमवार पेठ, सोलापूर सध्या बेगमपेठ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.शहरात वाढलेले आयपीएल सट्टयाचा पर्दाफाश होण्याससाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या दृष्टीने पथक कामाला लागले होते. दि. २४ मे रोजी सपोनि जीवन दुरगुडे यांच्या पथकाला खबऱ्याकडून शास्त्रीनगर परिसरात आयपीएल सट्टा घेतला जात असल्याची कुणकुण लागली. शास्त्रीनगर येथील अज्ञ्जो पान शॉपजवलील नाल्याच्या शेजारी असलेल्या इमारतीत हा सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला.
या धाडीत नमूद बुकी हे आयपीएल क्रिकेटमधील सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याद्वारे सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार नमूद तिघांना अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन दुरगुडे, पोलिस अंमलदार वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, विजय वाळके, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे यांनी केली.
काय जप्त केले
या धाडीत आयपीएल सट्टा घेण्यासाठी वापरण्यात आलेले विविध कंपन्यांचे मोबाइल, लॅपटॉप, टेंब, एक टीव्ही, एक सेट टॉप बॉक्स, वायफाय राऊटर, इलेक्ट्रिक बोड असा २ लाख ८ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.