सोलापूरः कवींनी संतसाहित्याचा अभ्यास करून या साहित्यातील विचार आपल्या कवितांच्या माध्यमातून मांडले पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारूती चिमतपल्ली यांनी व्यक्त केली. ते जागृती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ कवयित्री मनीषा कोठे यांच्या मनीचे तरंग या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी, जागृती पब्लिकेशनचे प्रमुख विजय गायकवाड, कवयित्री मनीषा कोठे, शिक्षिका बीना उगले, स्नेहा कोठे आदी उपस्थित होते. अक्कलकोट रोड येथील श्री. चितमपल्ली यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पुढे बोलताना चितमपल्ली म्हणाले की, कवितेतून प्रबोधन झाले पाहिजे. संत महात्म्यांनी आपल्या साहित्याला प्रबोधनाचे माध्यम बनविले होते. त्यासाठी आजच्या कविंनी संत साहित्याचा अभ्यास करून त्यातील विचार आपल्या काव्याच्या माध्यमातून समाजापुढे आणले पाहिजेत.
प्रकाशक विजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी चिमतपल्ली यांच्या कार्याचा गौरव गात मनीचे तरंग पुस्तकाचा आढावा घेतला. यावेळी ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी म्हणाले की, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी असे संत वाक्य आहे. त्याअर्थाने चितमपल्ली यांनी प्राणी आणि वृक्षावर आयुष्यभर प्रेम केले त्यामुळं ते संतच आहेत. समस्त मानव जातीसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. याप्रसंगी कवयित्री मनीषा कोठे यांनी चितमपल्ली यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकातील कविता सादर केली.