पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदींनी कालच तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. कारवाईची वेळ आणि ठिकाण तुम्ही निवडा, अशा शब्दांत मोदींनी सैन्य दलांना पूर्ण मुभा दिली. त्यामुळे पाकिस्तानविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. यानंतर आता मोदींनी त्यांचा मॉस्को दौरा रद्द केला आहे. पुढील महिन्यात मोदी मॉस्कोच्या दौऱ्यावर जाणार होते. मोदींनी अचानक त्यांचा दौरा रद्द केल्यानं येत्या काही दिवसांत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. हल्ल्याचं वृत्त येताच मोदींनी दौरा अर्धवट सोडला आणि ते मायदेशी परतले. त्यांनी सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. तेव्हापासून गेल्या आठवड्याभरात दिल्लीत बैठकांनी जोर धरला आहे. पण पहलगाममध्ये २६ जणांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकही जण सापडलेला नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर जनभावना तीव्र आहे. त्यामुळे सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी रशियाचा दौरा रद्द केला आहे.९ मे रोजी मॉस्कोमध्ये व्हिक्टरी परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमाला मोदी हजर राहणार नाहीत. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांचे माध्यम सचिव दिमित्री पेस्कोव यांनी ही माहिती दिली. मोदींचा दौरा रद्द होण्यामागील कारण पेस्कोव यांनी सांगितलेलं नाही. पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. सुरक्षा स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबद्दल भारत सरकारनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.