येस न्युज नेटवर्क : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली. धक्कादायक मेसेजनंतर पोलिसांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात पुन्हा एकदा एक थक्क करणारा मेसेज आला आहे. यावेळी मात्र एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नंबरवर आल्या. यामध्ये एका अज्ञात इसमानं दावा केला होता की, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही या अज्ञात इसमानं म्हटलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले.