सोलापूर सोशल फाउंडेशनचा पुढाकार; वारकरी करणार जिल्हातील तीर्थक्षेत्राचा प्रचार
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा जागर करून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल महाविद्यालय यांच्या वतीने27 सप्टेंबर पासून जिल्ह्यात तीर्थक्षेत्र पर्यटन सप्ताह राबवणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर सोशल फाउंडेशन आणि लोकमंगल विद्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय धर्म-सांस्कृतिक सभा रविवारी लोकमंगल शिक्षण संकुल, वडाळा येथे पार पडली, यावेळी आमदार देशमुख बोलत होते.
या बैठकीत जागतिक पर्यटन दिन (२७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) दरम्यान तीर्थक्षेत्र पर्यटन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सप्ताहात जिल्ह्यातील धार्मिक व तीर्थस्थळांचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील अखिल भाविक वारकरी पुढाकार घेणार असून प्रत्येक गावात एक वारकरी प्रतिनिधी नेमण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प. सुधाकर इंगळे यांनी दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बालकांच्या संस्कारांसाठी वारकरी चळवळी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. “ब्रम्हांडाचा मालक सोलापूर जिल्ह्यात आहे,” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष अभिमन्यू डोंगरे यांनी केले.
“सोलापूर जिल्ह्यात जगाचा देव आहे,” असे सांगत अखिल भाविक वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी धार्मिक पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित केले.
“देव, देश आणि धर्माच्या निष्ठेने सेवा करणाऱ्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांची ओळख पटवायला हवी,” असा इशारा ह.भ.प. भागवत चवरे यांनी यावेळी दिला.
यावेळी ह.भ.प. बळीराम जांभळे, ह.भ.प. मोहन शेळके, किसन कापसे, विश्व वारकरी सेनेचे तुकाराम भोसले, प्रभाकर वाघचौरे, रामहरी शेंडगे, सुरेश तोडकरी, काका पाटील, दादा काशिद, बाळासाहेब बाबर, प्रकाश हविले, बाळासाहेब हारदाडे, पंडीत गव्हाणे, हरिप्रसाद धर्माधिकारी, संजय पाटील, प्रकाश पवार, संभाजी शिंदे, उत्तम शिंदे, तानाजी बेलेराव,सागर अक्कलकोटे तसेच महिला वारकरी आदी उपस्थित होते.
सरकारच्या अभिनंदनाचा ठराव..
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’, अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’, इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’, निजामपूरचे ‘रायगडवाडी’ असे नामांतर केल्याबद्दल राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव ज्योतीराम चांगभले (प्रदेशाध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ) यांनी मांडला.
तुम्ही ठरवलं, तर सोलापूरचे धार्मिक पर्यटन निश्चित घडू शकतं
पंढरपूर मार्केटींग करायचे आहे अक्कलकोट व शिर्डी या ठिकाणचे पर्यटन म्हणून मार्केटींग झाले तसे पंढरपूरचे करायचे आहे. पंढरी अध्यात्म नगरी आहे. त्याचे मार्केटिंग आवश्यक आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे करण्याचे आवाहन केले.
