- माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम
- 15 ऑगस्टला उद्घाटन; तीन दिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी खुले
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर व मध्य रेल्वे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 15 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आयोजित करण्यात येणार आहे.
छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनच्या टिकीट खिडकी येथे करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर आदी उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील महत्वपूर्ण माहिती चित्रमय आणि मजकूर रुपाने प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना बघता येईल. हे प्रदर्शन संपूर्ण राज्यात नागपूर, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि मुंबई या शहरात 15 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनामध्ये 1757 ची प्लासीची लढाई, संन्यासी विद्रोह, कित्तूर विद्रोह, 1857 लढ्यातील महान क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांचे छायाचित्र व मजकूर, राजाराममोहन रॉय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, डॉ अॅनी बेझंट, पंडिता रमाबाई, मॅडम भिकाजी कामा, डॉ श्यामजी कृष्णा वर्मा, लाला हरदयाल, अरविंद घोष, लाला लजपतराय, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, चाफेकर बंधू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, अश्फाक उल्ला, सरोजिनी नायडू, अरुणा असफली, उषा मेहता इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना. चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहयोग आणि खिलाफत चळवळ, बार्डोली सत्याग्रह, चौराचौरी, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, विभाजन, स्वातंत्र्यदिन, संस्थानचे विलीनीकरण आणि संविधान सभा आदी महत्वपूर्ण घटनांचे दुर्मिळ छायाचित्र आणि मजकुरांच्या माध्यमातून बघता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे असे आवाहन केंद्रिय संचार ब्युरो, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले आहे.