मुंबई – अतिवृष्टीमुळे शेतकरी कमालीच्या संकटात सापडला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याची मागणी होत असताना पाटील यांनी हे विधान केल्यामुळे सरकारवर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला जात आहे.
गत काही महिन्यांत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. सरकारकडूनही या प्रकरणी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्याचे वादग्रस्त विधान करून एका नव्या वादाला फोडणी दिली आहे.
काय म्हणाले बाबासाहेब पाटील ?
जळगावच्या चोपडा येथे गुरूवारी एका बँकेच्या शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना बाबासाहेब पाटील यांनी वरील वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे आहे. त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. निवडणुकीच्या काळात कुणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केली, तर त्यालाही गावात नदी आणून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे लोकांनी काय मागायचे? हे ठरवले पाहिजे.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – रोहित पवार
दुसरीकडे, बाबासाहेब पाटील यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी पाटील यांनी या विधानाद्वारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी बाबासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आश्वासन द्यावी लागतात,’’ असं वक्तव्य करून राज्याच्या सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. हे अत्यंत संतापजनक विधान आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद नाहीय तर नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकरी उध्वस्त झालाय, त्यामुळं कर्जमाफी करून दिलासा द्यावा, ही शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.
मंत्री महोदयांच्या अहमदपूर मतदारसंघात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं. त्या भागात मी स्वतः दौरा केलाय. या भयानक संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कर्जमाफीची अपेक्षा तिथल्या शेतकऱ्यांनी केली होती. यात तुम्हाला ‘नाद’ दिसत असेल तर हे दुर्दैव आहे. या राज्यकर्त्यांना मला एकच सांगायचंय शेतकऱ्यांचा नाद करून नका, अन्यथा खूप महागात पडेल, असे ते म्हणालेत.
वाद होताच व्यक्त केली दिलगिरी
दुसरीकडे, या प्रकरणी वाद निर्माण होताच मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, काल मी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळटक करायची असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल, तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसारखी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे दर 10 दिवसांनी खिशात पैसे येतात. प्रपंचाला पैसे कमी पडत नाहीत. मग अर्बन बँक, पतसंस्था काहीही असोत.
माझीही बँक आहे. आम्हीही दूधाच्या व्यवसायाला पैसे देतो. या पतसंस्थेतून जे कर्ज दिले जाते, त्याला कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळू शकत नाही असे मी म्हणालो होतो. मी स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. विरोधकांकडून कर्जमाफीच्या मुद्यावरून जे राजकारण केले केले जाते, त्याला उद्देशून मी कर्जमाफीचा नाद लागला आहे असे विधान केले होते. माझे विधान असंवेदनशील नव्हते तर त्या प्रसंगाला अनुसरुन होते, असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी वादग्रस्त बोलण्याची ही पहिली वेळ नाही
उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारच्या एखाद्या मंत्र्याने शेतकऱ्यांविषयी असे वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान केले होते. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण सरकार एक रुपयात पीक विमा देते. त्यामुळे भिकारी शेतकरी नाही तर सरकार आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती.