उत्तर सोलापूर : तिहे, ता. उत्तर सोलापूर येथील सोलापूर तिहे मार्गे जाणाऱ्या पंढरपूर नॅशनल हायवे अधिकाऱ्यांनी मागील चार-पाच वर्षांपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाणाऱ्या ड्रेनेज पाण्याचे काम अर्धवट ठेवले आहे. यामुळे ड्रेनेजची दुर्गंधी सुटल्याने नागरिक आजारी पडत आहेत. तर रस्त्यावर पाणी वाहत असल्याने गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व आरोग्य केंद्रात ये जा करणाऱ्या नागरिकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून दुर्लक्ष केले जात आहे. पुढील चार ते पाच दिवसात पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यानिमित्त गावामध्ये गजानन महाराज पालखी येणार आहे. गजानन पालखी सोहळा येण्याच्या अगोदर नॅशनल हायवे अधिकाऱ्याने ड्रेनेज गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज माने युवा मंचचे समन्वयक अजय सोनटक्के, सरपंच गोवर्धन जगताप, माजी सरपंच नेताजी सुरवसे यांनी सांगितले