सोलापूर : शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन दर्जेदार ई_ साहित्य निर्माण व्हावे, यासाठी सर्व माध्यमाच्या सर्व शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते बारावी पर्यंत एकूण सहा गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडी येथील उपशिक्षक परमेश्वर सुरवसे यांनी इयत्ता पहिली ते दुसरीच्या गटात तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक तर त्याच गटात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
त्यांचा सत्कार नुकताच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांच्या हस्ते व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला. जिल्हास्तरावरील द्वितीय क्रमांकाचे रुपये साडेआठ हजार व तालुका स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे रुपये दोन हजार , प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.



शिवछत्रपती रंगभवन सोलापूर येथे 29 मार्च रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी डायटचे अधिव्याख्याता शशिकांत शिंदे , तुकाराम राजे ,बापुराव जमादार आदी मान्यवर व जिल्ह्यातील सर्व शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. परमेश्वर सुरवसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडी येथे कार्यरत असून नुकताच त्यांच्या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. याशिवाय परमेश्वर सुरवसे तालुकाभर योग शिक्षक म्हणून व बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव , विस्तार अधिकारी शिवराज ढाले, मुख्याध्यापक रामकृष्ण केदार, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन यादव सर्व शिक्षक व ग्रामस्थांमधून अभिनंदन करण्यात आले.